तळेगाव पोलिसांची धडक कारवाई; ६.४५ लाखांचे मोहा रसायन व हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य जप्त
तळेगाव पोलिसांची धडक कारवाई; ६.४५ लाखांचे मोहा रसायन व हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य जप्त
वर्धा | तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा
वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या अवैध दारूविरोधी मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. आर्वी उपविभागाच्या विशेष दारूबंदी पथकाने तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा जामनेर शिवारात छापा टाकून ६ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. विशेष दारूबंदी पथकाने मौजा जामनेर येथील एका शेतात अचानक धाड टाकली. यावेळी २४ लोखंडी ड्रममध्ये साठवून ठेवलेले सुमारे ४ हजार लिटर मोहा रसायन (सडवा) तसेच गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी संपूर्ण साहित्य जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया राबविली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ४५ हजार ६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वी उपविभागाच्या विशेष दारूबंदी पथकाने केली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे, पोलीस हवालदार राजेश, पोलीस शिपाई प्रतीक, महिला पोलीस शिपाई शिल्पा तसेच चालक पोलीस शिपाई सूरज भागने यांचा समावेश होता.